हिरे महाग का असतात? हिरे हे अर्थातच दुर्मिळ असतात आणि दुर्मिळ वस्तूंची नेहमीच किंमत जास्त असते. परंतु हिऱ्यांच्या बाबतीत केवळ दुर्मिळत...
हिरे महाग का असतात? हिरे हे अर्थातच दुर्मिळ असतात आणि दुर्मिळ वस्तूंची नेहमीच किंमत जास्त असते. परंतु हिऱ्यांच्या बाबतीत केवळ दुर्मिळता हेच कारण पुरेसे नाही. वस्तू ही आपल्या मनाप्रमाणे असली की ती महागच असते आणि हिरे खरोखरच आपल्या मनाप्रमाणे असतात. हिऱ्यांचा आकर्षकपणा आपल्या मनावर ठसतो.
हिऱ्यामध्ये प्रकाशपरिवर्तनाचं इतकं सामर्थ्य असतं की, त्यामुळे जगातील दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा हिरा हा चांगला दिसतो. मानवाला ज्ञात असलेल्या पदार्थामध्ये हिरा हा सर्वांत अधिक कठीण पदार्थ आहे. हिरा म्हणजे सौंदर्याचं एक प्रतीक आहे. तो हजारो वर्षे टिकून राहतो. हिरा म्हणजे चिरकाल टिकून राहणाऱ्या प्रीतीचे आणि पातिव्रत्याचे चिन्ह आहे, असा समज आहे.
हिरे हे नैसर्गिकरीत्या सुंदर नसतात. त्यांच्यावर खूप मेहनत घेऊन त्यांना सुंदर केले जाते. हिरे हे ओबडधोबड स्वरूपात आणि सर्व मोजमापांमध्ये व आकारांमध्ये सापडतात आणि ते बाहेरून काही अंशी निस्तेज दिसतात. हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या अनुभवी लोकांना अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक हिरा पारखावा लागतो आणि नंतर त्याला सौंदर्य कसे प्राप्त करून देता येईल ते ठरवावे लागते. काही वेळा हिरा हा हिऱ्याची भुकटी असलेल्या व जोराने फिरणाऱ्या चाकाने कापला जातो. दुसरा हिरा घासण्यासाठी फक्त हिऱ्याचीच भुकटी वापरावी लागते.
खूपसे हिरे दोन भागांत कापले जातात आणि प्रत्येक अर्धभागाला आकार दिला जातो आणि तो गोल हिऱ्याच्या आकारात छेदला जातो त्यास 'ब्रिलिअंट' हिरा म्हणतात. द्रुतगती असलेल्या ओतीव लोखंडाच्या चाकांनी जी हिऱ्याच्या भुकटीने आणि तेलाने आंतरित केलेली असतात, अशा चाकांच्या मदतीने हिऱ्यांचे पृष्ठभाग घासले जातात. ह्यालाच आपण हिऱ्याला पैलू पाडणे म्हणतो.
सर्व पृष्ठभाग सम्मिताकार कापले जातात आणि सर्वसाधारण ब्रिलियंट हिऱ्याला ५८ पृष्ठफळे असतात. जितकी जास्त पृष्ठफळे अथवा पैलू, तितका हिरा जास्त जास्त तेजस्वी ! हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या लोकांनी सर्व प्रकारच्या आकारांची मालिकाच तयार केलेली आहे. उदाहरणार्थ, हिरव्या पाचूचा कट, बेंग्यूट कट, मारक्विस कट इत्यादी.
बाजारात जे हिरे जडजवाहीर म्हणून विकावयास येतात त्यांच्यात रंग आणि गुणवत्तेचा दर्जा ह्याबाबतीत फारच तफावत असते. काही रंग दुसऱ्यांशी क्वचितच मिळणारे असतात. सर्वात मौल्यवान हिरे असे असतात की त्यांच्या छटा लाल किंवा निळ्या असतात किंवा जे स्फटिकासारखे स्वच्छ आणि रंगहीन असतात.
COMMENTS