माणसाला नेहमीच करमणूक आवडते. संस्कृतीच्या अगदी आरंभापासून जादूगार, व्यायामपटू, माकडवाले, अस्वलवाले असे जनावरांना शिकविणारे लोक आणि विदू...
माणसाला नेहमीच करमणूक आवडते. संस्कृतीच्या अगदी आरंभापासून जादूगार, व्यायामपटू, माकडवाले, अस्वलवाले असे जनावरांना शिकविणारे लोक आणि विदूषक हे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी अस्तित्वात होते व आहेत. प्राचीन ग्रीसमध्ये रथ-शर्यती, चीनमध्ये डोंबारी आणि इजिप्तमध्ये जनावरांना शिकविणारे लोक होते.
सर्वप्रथम रोमन लोकांना मारामारी आणि सर्कसमधल्या वेगवेगळ्या अनेक कसरती ह्यांची मनोरंजन म्हणून कल्पना सूचली. प्रत्यक्षपणे, 'circus' हा शब्द लॅटिन शब्दापासून शर्यतीच्या संबंधात आलेला आहे, तो एक तऱ्हेचा खेळ ह्या अर्थी आलेला नाही. म्हणून शर्यतीबरोबर सर्कसला आरंभ झाला आणि ह्या सर्कशींसाठी बांधलेल्या सांगाड्याला 'Circuses' असे संबोधण्यात आले व हे सर्व रोमन लोकांनी केले. पहिली आणि सर्वांत मोठी असलेली म्हणजे 'सर्कस मॅक्झिमस', ती इ. स. पू. तिसऱ्या शतकात सुरू झाली आणि ती इतकी विस्तारित केली गेली की १,५०,००० लोकांपेक्षा अधिक लोक त्यामध्ये बसू शकत होते.
ज्या वेळी रोमन लोक ह्या सर्कसीसाठी येत, ते त्यांना अद्ययावत सर्कसप्रमाणे अथवा जत्रेच्या स्थळासारखे वाटत होते. त्या समयी तेथे केक विकणारे, दारू विकणारे आणि इतर विभिन्न प्रकारच्या वस्तू विकणारे फेरीवाले असत. त्या वेळी तेथे प्रवेश विनामूल्य होता, कारण सरकारला लोकांना समाधानी व संतुष्ट ठेवण्यासाठी ह्या सर्कशी हव्या होत्या.
नंतरच्या काळात रोममध्ये सर्व दुसऱ्या तऱ्हेचे करमणुकीचे खेळ सुरू झाले. त्यामुळे आपण ज्याला हल्ली सर्कस म्हणतो ती खरी सर्कस सुरू झाली. काही काही थिएटर्समध्ये विदूषक, जादूगार, कसरत करणारे, दोरीवरून चालणारे आणि जनावरांना शिकविणारे होते. काहींच्यामधे बॉक्सिंग करणारी अस्वलेसुद्धा होती. आणि शर्यतीच्या मैदानावर, एकाच वेळी दोन घोडे दौडण्याच्या युक्त्या, धावत्या घोड्यावरून दुसऱ्या धावत्या घोड्यावर उड्या मारणारे जॉकी, रथशर्यती असे प्रकार जे आपल्या अद्ययावत सर्कसमध्ये आढळतात ते आढळू लागले.
मध्ययुगीन काळात व्यवस्थित संघटित केलेली अशी एकही सर्कस नव्हती; परंतु वेगवेगळी धाडसाची कामे करणारे लोक इतस्ततः भटकून आपले कौशल्य दाखवीत होते. १७६८ मध्ये पहिली सुसंघटित सर्कस, जी आज आपणांस माहीत आहे, ती इंग्लिशमन फिलिप अॅस्टलेकडून दाखविण्यात आली. त्याने लंडनमध्ये अनेक आसने (seats) असलेली इमारत बांधली. त्याने घोड्यावर वेगवेगळ्या घोडदौड करणाऱ्या कसरती, शारीरिक विविध कसरती, विदूषक आणि दोरीवरून चालणारे लोक दाखविले. त्याच्यानंतर अनेक लोकांनी तीच कल्पना उचलली आणि अशा तऱ्हेने सर्व जगभर सर्कस लोकप्रिय झाली.
COMMENTS