फोटो प्रतीकात्मक कलकत्त्याजवळील गौडिया मठातून दीक्षा घेतलेले 'हिज डिव्हाईन प्रेस ए.सी. (?) भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद' हे सप्...
कलकत्त्याजवळील गौडिया मठातून दीक्षा घेतलेले 'हिज डिव्हाईन प्रेस ए.सी. (?) भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद' हे सप्टेंबर १९६५ मध्ये अमेरिकेत गेले आणि जुलै १९६६ मध्ये त्यांनी 'इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शसनेस (ISKCON) ची स्थापना केली. १९६८ मध्ये वेस्ट व्हर्जिनियात त्यांनी 'न्यू ब्रिंदबन' उभारलं. दोन हजार एकरांच्या अफाट परिसरात 'कृष्णा'ला जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. १९७२ मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण 'वैदिक पद्धती'नं देण्यासाठी त्यांनी डलास (टेक्सास) येथे गुरुकुल सुरू केलं. त्यांच्या 'प्रभावित आणि प्रशिक्षित' शिष्यांनी मग अशा गुरुकुलांचं जाळंच अमेरिकेत आणि इतरत्र पसरवलं.
या गुरुकुलात पाठविलेल्या मुलांवर चालणाऱ्या अत्याचारांची ही कहाणी...
या काळात पाश्चात्य जगतात आणि त्यातही विशेषतः अमेरिकेत (यूएसए) व्यक्तिवादाचा स्फोट झाला होता. समृद्धी तर होतीच. त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध, सांस्कृतिक निर्बंधाविरुद्ध बंड पुकारण्याच्या प्रेरणेतून 'हिप्पी' संस्कृती उदयाला आली होती. या चुकीच्या दिशेनं होत असलेल्या बंडखोरीचा एक भाग म्हणून, तिथल्या प्रस्थापित धर्मापेक्षा वेगळ्या 'कशाची तरी' (!) ओढ बऱ्याच तरुण मंडळींना होती. या 'संस्कृती'विरोधी चळवळीचा सर्वाधिक फायदा 'इस्कॉन'ला मिळाला. 'हरे क्रिश्ना= हिप्पी' हे समीकरण त्या काळात दृढ झालं होतं. या काळात, जे धार्मिक पंथ उदयाला आले, त्यात सगळ्यात जाचक निर्बंध असणारा, तरीही प्रभावशाली ठरलेला हुकूमशाही पंथ म्हणजे 'इस्कॉन.' या पंथाच्या प्रभावाखाली येऊन 'हरे क्रिश्ना' झालेल्या आई-बापांनी आपली मुलं 'इस्कॉन'च्या गुरुकुलात अजाण वयात पाठविली. या मुलांना तिथे अनन्वित अत्याचारांना तोंड द्यावं लागलं. तीस वर्षांनंतर आता कुठे या गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत...
७० आणि ८० च्या दशकातली मुलं आता मोठी झाली आहेत आणि आपल्यावर अजाण वयात झालेल्या अत्याचारांविरुद्ध त्यांनी दावे दाखल केले आहेत. आज अमेरिकेत ४०० दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई मागणारे ५०० खटले न्यायप्रविष्ट आहेत. डलास (टेक्सास) च्या कोर्टात १२ जून २००० या दिवशी जेव्हा पहिल्यांदा हा खटला दाखल झाला, तेव्हा त्यात ९० लोकांचा सहभाग होता. इस्कॉन संस्था, तिच्या १६ शाखा, संस्थापक प्रभुपादांसह संचालक मंडळावरच्या १७ व्यक्ती, यांच्याविरुद्ध हा खटला दाखल झाला. अर्जदारांचे वकील विंडल टर्ले यांनी तेव्हा असं म्हटलं होतं, "आपण कल्पनाही करू शकत नाही; पण बलात्कार, लैंगिक अत्याचार, मारहाण, दहशत असले भयानक प्रकार अगदी तीन वर्षे वयाच्या मुलांनाही भोगायला लागले आहेत. हजारभर तरी मुलं या अत्याचारांचे बळी ठरली असावीत. त्यापैकी कित्येकांनी आत्महत्या तरी केली आहे किंवा काहीही करण्यास ते भावनिकदृष्ट्या असमर्थ बनले आहेत. 'इस्कॉन-बालकां'ची अख्खी पिढी कायमची बरबाद झाली आहे...."
काही टीकाकारांनी तेव्हा ही एक खेळी असल्याची टीका केली होती. पण २००३ मध्ये 'इस्कॉन'नंच, कॅलिफोर्निया आणि वेस्ट व्हर्जिनियातील कोर्टात दिवाळं निघाल्याचा अर्ज दाखल केला. जगभरातील 'इस्कॉन'ची केंद्रं आणि मंदिरं यांच्याकडे जमा होणाऱ्या पैशांतून, 'शक्य झाल्यास' १५ दशलक्ष डॉलर्सची भरपाई देऊ शकू, असंही सांगितलं. पण कोर्टानं मात्र 'अशा अत्याचाराविरुद्ध दावे दाखल करतील, असे आणखी बळी आहेत का,' याचा शोध घेण्याचा हुकूम केला. त्यांना टर्ले यांनी टेक्सासमध्ये दाखल केलेल्या खटल्यात समाविष्ट करून घेण्यात आलं. या तक्रारींवरून असं लक्षात येतं की, किमान आठशे ते हजार मुलांना भावनिक, शारीरिक आणि लैंगिक छळाला तोंड द्यावं लागलंय. यातले बरेचसे प्रकार 'गुरुकुल-आश्रमशाळा'त घडले आहेत; विशेषतः अमेरिकेतील डलास, वेस्ट व्हर्जिनिया, व्हॅन्कुव्हर व न्यूयॉर्क येथील गुरुकुलात आणि भारतातील वृंदावन व मायापूर येथील गुरुकुलात असलेल्या मुलांच्या ठोस तक्रारी आहेत; बाहेर न आलेल्या घटनांची बातच सोडा.
पुट्टपुर्थीच्या सत्यसाईबाबापासून कोल्हापूरच्या तोडकरबुवापर्यंत सामान्यतः सगळेच जण लैंगिक छळाचे दावे नाकारताना दिसतात. (ते खरे असतात, ही गोष्ट निराळी!) 'इस्कॉन'नं मात्र कुठलाही दावा नाकारला नाही. त्यांनी व्हमॉन्ट विद्यापीठातील प्रोफेसर बर्क रॉशफोर्ड यांना या तक्रारींबद्दल संशोधन करण्यासाठी बोलावलं आणि १९९८ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला. एक बालक संरक्षण कार्यालय स्थापन केलं, एक 'टास्क फोर्स' ही तयार केला. यातून २०० लोकांची यादी समोर आली. त्यांच्यावर काही कारवाई झाल्याची मात्र नोंद नाही.
या अत्याचारांना वाव तरी कसा मिळाला? 'इस्कॉन'चे संस्थापक आणि प्रमुख, स्वामी प्रभुपाद यांचा असा आग्रह असायचा की, 'हरे क्रिश्ना' आई-बापांनी त्यांच्या मुलांना पाच किंवा त्याहीपेक्षा कमी वयातच गुरुकुलात पाठवायला पाहिजे, म्हणजे ते निष्ठावान भक्त होतील, त्यांचं जीवन अध्यात्ममय होईल! आई-बाप आणि मूल यांच्यातील प्रेमाचा बंध तुटला, तर मुलं खऱ्या अर्थानं आध्यात्मिक होतील, संन्यस्त होतील. कारण आध्यात्मिक जगात आई-बाप नसतात, फक्त आत्मे असतात!
आई-बापांना लेखी कळवलं जायचं की, 'गुरूंवर विश्वास ठेवा' (नाहीतर मुलांना गुरुकुलात पाठवूच नका!) मुलांना वर्षातून एकदा किंवा दोनदा भेटायला मिळेल. आई-बापांबद्दल प्रेम हे इतर भौतिक गोष्टींसारखी 'माया' आहे, त्यात लिप्त झालात तर 'क्रिश्ना'चं काम कसं होणार? 'क्रिश्ना'च्या या कामात संस्थेसाठी पैसे जमवणं, हाही भाग असे; पण यापैकी फारच थोडा पैसा या मुलांच्या देखभालीसाठी खर्च होई.
या मुलांची घरून येणारी पत्रंसुद्धा तपासली (सेन्सॉर!) जात. आश्रमात वेगळ्या इमारतीत त्यांना ठेवलं जाई या दुष्ट आणि नश्वर जगाचा संपर्कसुद्धा नको! भारतातल्या वृंदावन येथील आश्रमाला कुतुहलापोटी भेट देणाऱ्यांना, या आश्रमात मुलं राहतात, असं जाणवलंसुद्धा नाही, इतकं त्यांना 'अलिप्त' ठेवलं जायचं, कदाचित अजूनही जात असे. 'इस्कॉन'च्या आश्रमांना भेट देणाऱ्या व्यक्तींना आजही 'हरे क्रिश्न'च्या तालावर नाचावं लागतं, हातात माळ घेऊन जप करावा लागतो. असं केलं की, 'बॅड कर्मा'चा नाश होतो, बेकारांना नोकरी मिळते, अविवाहितांची लग्नं होतात ('क्रिश्ना' आधीच त्यांचे पार्टनर्स ठरवत असतो), 'क्रिश्ना'चा 'कॉन्शस' जागा झाला की, तुमचं सगळं जीवन सुखात जातं. 'रियली ग्रेट अध्यात्म!' पण आश्रमात राहणाऱ्या बिचाऱ्या मुलांच्या आयुष्याचं काय ?
टर्ले यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार आणि 'इस्कॉन'च्या अहवालानुसार या काळात जे घडलं, ते फार भयानक आहे. सर्व प्रकारच्या मारहाणीमुळे या मुलांना जखमा होत, नाकाची हाडे मोडत, दात पडत, कानावर मारल्यामुळे रक्तस्त्राव झाल्याच्या आणि बहिरेपणा आल्याच्याही घटना आहेत. मलेरिया, हिपॅटायटिस सारख्या जीवघेण्या आजारांवर आणि मोडलेल्या नाकावर उपचार केले जात नसत. त्यांना खायला योग्य आणि पुरेसं अन्न मिळत नसे. यापैकी काहीजण तर 'नेहमीच भुकेलं असल्या'च्या आठवणी सांगतात, पोट भरण्यासाठी मग ते इतरांचं उष्टं खात, किडे-माशा बसलेलं अन्नही गिळत, काही वेळा तर स्वत:चीच उलटीही! ज्यांना झोपेत 'शू' होत असे, अशा मुलांना लघवी प्यायला लावत आणि ओली चड्डी डोक्यावर टोपीसारखी घालायला लावत. याशिवाय चुकांबद्दल कपाट किंवा फ्रिजमध्ये बंद करून ठेवणं किंवा मोठाल्या कचराकुंड्यांमध्ये तासच्या तास बसायला लावणं, अशा शिक्षा दिल्या जात. शाळा गलिच्छ असत आणि खोल्यांमध्ये गर्दी करून, जमिनीवर स्लीपिंग बॅग्समध्ये झोपावं लागे. टीव्ही, रेडिओ, खेळणी असलं काही नव्हतं. कारण भौतिक जगापासून अलिप्त राहायचं. मुलींची अकरा-बाराव्या वर्षांपासून दुप्पट- तिप्पट वयाच्या माणसांबरोबर लग्नं लावून दिली जात.
हे अत्याचार करणारे कोण असत? गुरुकुलातले शिक्षक, आश्रमातले वरिष्ठ आणि व्यवस्थापक, काही वेळा तर तथाकथित संन्यासी आणि 'इस्कॉन' गुरूही! मुलांना सांगितलं जायचं की, त्यांना अशी वागणूक मिळण्याचं कारण त्यांचीच वाईट कर्म आहेत, मागच्या जन्मी त्यांनी एखाद्या मुलाला असंच वागवलं असणार! हरे कृष्णा !!
प्रोफेसर रॉशफोर्ड यांच्या वीस वर्षांच्या निरीक्षणानुसार, 'इस्कॉन'चे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांना शारीरिक शिक्षांबद्दल कल्पना होती! अस्वस्थ पालकांकडून त्यांना तशी पत्रंही येत असत. लैंगिक छळाबद्दल त्यांना माहिती होती की नाही, याबद्दल शंका आहे; पण त्यांचं धोरण मात्र सर्वच बाबतीत गुप्तता पाळण्याचं होतं! त्यांचे गिनेचुने सहकारी सोडता, बऱ्याच 'हरे क्रिश्नां'ना, पालकांना आणि बाहेरील लोकांना याचा पत्ताच नव्हता. १९७७ साली त्यांचा मृत्यू झाला आणि अकरा 'गुरूं'च्याकडे त्यांचा वारसा आला. अत्याचार चालूच राहिले...
नोरी मस्टर ही एक आधीची 'इस्कॉन' भक्त. 'इस्कॉन'मध्ये आलेल्या आपल्या अनुभवांवर आधारित 'बिट्रेअल ऑफ द स्पिरीट' (इलिनॉईस युनिव्हर्सिटी प्रेस, १९९७) हे पुस्तक तिनं लिहिलंय. ती म्हणते की, 'इस्कॉन'च्या गुरुकुलामधून अतिशय गंभीर प्रकारचे अत्याचार, भावनिक, शारीरिक आणि लैंगिक अशा सर्व पातळ्यांवर चालत. पालकांनी काही विचारायचा प्रयत्न केला, तर त्यांना गप्प बसवलं जाई किंवा लाथा मारून हाकलून लावलं जाई. काही पालकांनी आपली मुलं संस्थेतून काढून नेली, तर काही 'अजाण' पालकांनी ही 'इस्कॉन'ची पद्धत म्हणून तिकडे दुर्लक्ष केलं किंवा स्वतःच मुलांना बुडवलं!
फेब्रुवारी १९८७ मध्ये एका मुलाच्या तक्रारीवरून 'न्यू वृंदावन'चा प्राचार्य लॅरी गार्डनर आणि त्यांचा सहकारी फ्रेडरिक डी फ्रान्सिस्को यांना अटक झाली आणि पालकांनी धैर्य गोळा करायला सुरुवात केली. 'इस्कॉन' चा शिक्षणमंत्री जगदीश महाराज याला एका मुलाच्या आईनं 'गीतानगरी' गुरुकुलात (पेनिसिल्व्हानिया) चालणाऱ्या मुलांवरील अत्याचारासंबंधी पत्र लिहिलं. 'एकंदर पाच मुलांचा छळ झाल्याचं दिसतं. गुदमैथुनाचा प्रयत्न झाला आहे आणि मुखमैथुन तर वारंवार चालतं. हे सगळं गेली दीड वर्षं कुणालाही संशय न येता चाललंय, असं दिसतं. कदाचित या मुलांना काय भोगावं लागतंय, हे तुमच्या कानावर आलं नसेल. तुमच्या लक्षात येईल की, या दांभिकतेमुळेच ती सगळं तत्त्वज्ञान नाकारत असावीत. कुत्रेसुद्धा जगत नसतील, असं लैंगिक वर्तन पाहिल्या आणि अनुभवल्यानंतर त्यांना जप कसा सुचावा आणि गुरूंबद्दल आदर तरी कसा वाटावा?' या पत्राकडे अर्थातच दुर्लक्ष केलं गेलं (२६ जानेवारी १९८८).
१९९० नंतर अत्याचाराच्या या कहाण्या बाहेर येऊ लागल्या. निर्मलचंद्र हिकी आणि माया चार्नेल या जोडीनं काही मुलांचे अनुभव प्रकाशित केले ('व्हायोलेशन्स ऑफ इस्कॉन एक्स्पोज्ड' वेबसाईट) आणि स्वामी प्रभुपादांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हे प्रकार या पातळीला येऊन पोचल्याचं ते सांगतात. (निर्मलचंद्र हा जगदीश महाराजाचा मुलगा. १९८६ मध्ये एका अपघातानंतर मानेखालील शरीर लुळं पडलं. त्यानंतर त्यानं वृंदावन गुरुकुलातले अनुभव लिहायला सुरुवात केली.)
मे १९९६ मध्ये लॉस एंजेल्समध्ये झालेल्या एका बैठकीत भारतातल्या वृंदावन गुरुकुलातील दहा जुन्या 'हरे क्रिश्ना' विद्यार्थ्यांनी प्रथम आवाज उठविला. आपल्याला रोज मारहाण होत असे, वैद्यकीय मदत मिळत नसे आणि सुऱ्याच्या धाकावर समलिंगी संबंध लादले जात असत, असं प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केलं. ज्यांच्याविरुद्ध हे आरोप होते, त्या प्राचार्य धुनर्धरवर काहीही कारवाई झाली नाही!
प्रसारमाध्यमांना या सगळ्या प्रकारांबाबत तशी उशिराच, म्हणजे ९०च्या दशकाच्या शेवटी शेवटी माहिती मिळाली. याकडे सुरुवातीला दुर्लक्ष झालं. याचं कारण एकंदरच धार्मिक क्षेत्रात त्या-त्या पंथाच्या 'गुरूं'च्या शब्दावर जास्त विश्वास ठेवला जात असे. जसजशा चर्चमधील अत्याचारांच्या कहाण्या पुराव्यानिशी सिद्ध होताच दिसू लागल्या, तसं माध्यमांनी इतर पंथांकडेही आपलं लक्ष वळविलं.
ज्यांनी हा अनन्वित छळ सहन केला, त्यांनी त्या गोष्टी जाहीर करायला इतका उशीर का केला? २००० साली दाखल झालेल्या ९० तक्रारींची संख्या ५०० वर जाण्यासाठी जाहिराती का द्याव्या लागल्या? गुरुकुलात शिकलेल्या आणखी कुणाला दावा दाखल करायचा असेल, तर त्यासाठी टेक्सासच्या न्यायालयानं एप्रिल २००५ पर्यंत मुदतवाढ का द्यावी? एरव्हीही आपण पाहतो की, बुवाकडे जाऊन वाईट अनुभव आलेल्यांपैकी अनेक लोक गप्प बसतात. यात 'आपली लाज जाईल,' अशी भीती असते. काही वेळा आपल्याला काहीतरी त्रास होईल, अशी शंकाही असते. पण त्या पलिकडची आणखी एक गोष्ट असते, ती म्हणजे आपल्याच मनात संदिग्धता असणं! एकेकाळी ज्याच्यावर निस्सीम प्रेम आणि भक्ती केली, त्याच्याविरुद्ध बोलणं त्यांना अपराधी वाटतं. ज्या परिवारात ते राहिलेले असतात, त्याबद्दल त्यांच्या मनात कुटुंबियांइतकी आत्मियता असते, काही काळ तरी जीवनाला एक वेगळी दिशा (की दशा ?) मिळालेली असते. त्या काळात काहीतरी चांगलं घडलेलंच असतंच. आपला कंपू इतरांपेक्षा वेगळा आहे, असंही वाटत असतं. हे सगळं एका झटक्यात टाकून देणं सहज शक्य होत नाही. म्हणूनच या प्रक्रियेत बराच वेळ जातो. धार्मिक श्रद्धा ही गोष्टच अशी आहे की, त्या नावाखाली काहीही केलं, तरी क्षम्य ठरतं. त्यामुळेच मुलांवर अत्याचार झाले, तरी ते गंभीरपणे घेतले गेले नाहीत. बहुतेक सर्वच धर्मांमध्ये स्त्री हे पापाचं मूळ, ही कल्पना दृढ असल्यामुळे स्त्री-संबंधाचा निषेध आणि ब्रह्मचर्याचा आग्रह केला जातो. प्रकृतीविरोधी कृती केल्यामुळे मग विकृती वाढू लागते. 'इस्कॉन'च नव्हे, तर सगळ्याच बुवा-बाबांच्या बाबतीत हे प्रकार खरे असतात. जिथे ब्रह्मचर्याचा आग्रह नसतो, तिथे स्त्रियांसंबंधात घटना घडतात, तर सत्यसाईबाबासारख्या ठिकाणी इतर लैंगिक विकृती चालू असतात. बुवा-बाबा परमेश्वराचे अवतार (नाहीतर प्रेषित) असतात आणि त्यांचं तत्त्वज्ञान आणि वर्तन याबद्दल प्रश्न विचारायचे, असं म्हटलं की, मार्गच खुंटतो! तसंच 'इस्कॉन'च्या या वासनाकांडाचं झालंय. न्यायासाठी झगडणाऱ्या सगळ्याच मुलांच्या आई-बापांनी त्यांना पाठिंबा दिलेला नाही. काहीजण अजूनही 'हरे क्रिश्ना' आहेत आणि आपल्या मुलांच्या भयानक अनुभवांमागे त्यांचं 'बॅड कर्मा' आहे, याची त्यांना खात्री आहे. ब्रिजिट रिट्टेनॉर पाच वर्षांची असताना तिला डलास इथल्या डलास गुरुकुलात पाठविलं होतं. तिच्या आईनं तिला सांगितलंय की, हा खटला इतका पाखंड ठरेल की, शिक्षा म्हणून तिची जीभ कापली जाईल! 'क्रिश्ना कॉन्शसनेस'च्या नावाखाली छळ झालेल्या सगळ्यांनाच हे समजायला हवं की, त्यांनी जे भोगलं, ते त्यांचं 'नशीब', त्यांचं 'कर्म' नव्हतं. ते भयानक अत्याचाराचे बळी ठरले, हे तर खरंच. कायदेशीर मार्गानं 'इस्कॉन'ला धडा शिकवून आपलं आयुष्य मार्गाला लावणं, हेच आता महत्त्वाचं!
.... आजकाल आंतरराष्ट्रीय पातळीवर जीवनाची कला शिकविणाऱ्या गुरूंचं प्रस्थ वाढतंय आणि खास बालकांसाठी त्यांची वेगळी शिबिरही चालतात, त्याला उदंड प्रतिसादही मिळतोय. पालकांनो सावधान!!!